श्री साईंचे शतक महोत्सवी पुण्यतिथी वर्ष

नागपूर : श्री साईंचे शतक महोत्सवी पुण्यतिथी वर्ष साजरे करण्याच्या दृष्टीने शिर्डीतील विमानतळाचे काम तातडीने मार्गी लावणे आवश्यक असून विमानतळाच्या कामासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नोडल एजन्सी म्हणून नेमण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

Sai Mahotsav
Sai Mahotsav

श्री साईंचे शतक महोत्सवी पुण्यतिथी वर्ष 1 ऑक्टोबर 2017 ते 18 ऑक्टोबर 2018 या कालावधीत साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विधीमंडळातील सभागृहात आयोजित साईबाबा महासमाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महासमाधी शताब्दी महोत्सव लक्षात घेता पुढील 100 वर्षांच्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे असून त्यासाठी परिपूर्ण अशी ‘साई सिटी’ची निर्मिती करणे गरजेचे आहे. आगामी काळात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता नियोजित दर्शन रांग इमारत बांधकाम व मंदिर परिसर पुनर्विकास करण्यासाठी विख्यात वास्तुविशारदाची नेमणूक करावी. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरामधील महत्त्वाच्या ठिकाणी कायमस्वरुपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. संस्थानच्या नियोजित विकास प्रकल्पाचा आराखडा मुख्य सचिवांच्या समितीपुढे अंतिम करुन तो केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यानी सांगितले.

नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थानच्या नियोजित विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले. यावेळी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, प्रवीण दराडे, नगर विकास विभागाच्या सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *