विधानमंडळ हे जनतेच्या इच्छा, आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ- हरिभाऊ बागडे

नागपूर : जनता आपल्या इच्छा-आकांक्षांच्या पुर्ततेसाठी विधानमंडळाकडे लक्ष ठेवून असते. विधानमंडळ हे जनतेच्या इच्छा, आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

विधानभवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत सुरु असलेल्या संसदीय अभ्यासवर्गात शुक्रवारी त्यांचे व्याख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार ड. आशिष शेलार, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, अवर सचिव सुनिल झोरे यांच्यासह राज्यातील विविध 11 विद्यापीठातील विद्यार्थी, अधिव्याख्याते उपस्थित होते.

Rashtrakul_Adhyaksha
Rashtrakul_Adhyaksha

श्री. बागडे म्हणाले, जनहिताच्या अनेक प्रश्नांवर विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये व्यापक चर्चा होत असतात. दोन्ही सभागृहांचे सदस्य अभ्यासपूर्ण विचार व्यक्त करीत आहेत. त्या-त्या विषयावर सर्वंकष विचार करुनच विधानमंडळात कायद्यांची निर्मिती आणि धोरणांची आखणी होते. समाजातील विविध प्रश्नांवर विधानमंडळात चर्चा, विचारविनिमय होतो. त्यामुळे विधानमंडळ हे जनतेच्या इच्छा, आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे महत्वाचे व्यासपीठ आहे.

तरुणांनी शारीरिक आणि बौद्धिक श्रम केले तरच त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहू शकेल. आरोग्य चांगले राहिले तरच आजचा तरुण यशाची शिखरे पादाक्रांत करु शकेल. त्यामुळे आजच्या तरुणांनी श्रमाला प्रतिष्ठा द्यायला हवी, असे ते म्हणाले.

इस्त्राईल या देशाचे उदाहरण देऊन श्री. बागडे म्हणाले, इस्त्राईलचे नागरिक स्वत:पेक्षा आपल्या देशावर जास्त प्रेम करतात, त्यामुळे सर्व प्रकारची प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा आज तो देश विकसित देश म्हणून ओळखला जात आहे. आपल्या देशातील दुष्काळी भागापेक्षाही इस्त्राईलमध्ये कमी पाऊस पडतो, पण तरीही पाण्याचा नियोजनबद्ध वापर करुन आज त्या देशाने कृषीक्रांती केली आहे. आजच्या तरुणांनी जगभरातील अशा यशोगाथांचा आदर्श घेऊन आपल्या देशाच्या प्रगतीसाठी व्यापक कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे साधन आहे. गरिबी निर्मूलनासह इतर सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण शिक्षणाच्या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे तरुणांनी स्वत: शिक्षण घेणे आणि ज्ञानार्जन करण्याबरोबरच समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्री. बागडे यांनी केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची विद्यार्थिनी प्रियंका अब्रुक हिने उपस्थितांचे आभार मानले.

(source : Maha News)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *