जलयुक्त शिवारमुळे हिरवे स्वप्न उतरले सत्यात

‘पाणी हेच जीवन आहे’ या उक्तीनुसार सर्व सजीवांसाठी, प्राणीमात्रासाठी पाण्याचे महत्व आपल्या लक्षात येते. परंतू पाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षी गंभीर रुप धारण करीत आहे. भूतलावरील अस्तित्वात सजीवांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे महत्वाचे आहे. पाण्याचे व पाणी साठविण्याचे महत्व लक्षात घेता राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान 2014-19 हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. सर्वासाठी पाणी व टंचाईमुक्त महाराष्ट्र हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

राज्य शासनाने जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून या अभियानात गावांना व गावकऱ्यांना सहभागी करुन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा संकल्प केला व या अभियानाला जोमात सुरुवात झाली. आता हे अभियान जगातील सर्वात मोठी लोकचळवळ म्हणून नावारुपास येत आहे.

पर्जन्याची हमखास खात्री असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ऐन पिकाच्या वाढीच्या काळात पावसाचा खंड पडू लागला आहे. त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होऊ लागला. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवाचे डोळे आकाशाकडे भिडून राहायचे. परंतू जलयुक्त शिवार अभियानाने शिवार अभियानाने जणू सर्वांचेच डोळे उघडले व त्याचा परिणाम म्हणजे संरक्षित सिंचनाकरीता सर्वांचीच धडपड सुरु झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बेरडीपारमधील काचेवानी येथे तलाव खोलीकरणाचे काम या अभियानाअंतर्गत पूर्ण झाले. येथील तलावातील गाळाचे प्रमाण जास्त झाल्याने पाणी साठविण्याची क्षमता अत्यंत कमी झाली होती. या तलावातील गाळ काढून खोलीकरणाचे 13 लक्ष रुपयांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे सिंचन क्षमतेत प्रचंड वाढ झाली आहे. कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत तिरोडा येथील अदानी फाऊंडेशनने या तलावात 17 हजार 776 घनमीटर माती, गाळ काढून तलावाबाहेर टाकला. शेतकऱ्यांना सिंचनाच्या लाभाबरोबरच गुराढोरांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. तलावाच्या खाली बेरडीपार पाणीपुरवठा योजनेचे स्त्रोत घेण्यात आले असून तलावाला लागून असलेला अदानी पॉवर फाऊंडेशनच्या वसाहतीकरीता या पाणीसाठ्याचा उपयोग होत आहे. वाढलेल्या पाणीसाठ्यांमुळे परिसरातील पाण्याची पातळीही उंचावली आहे.

शेतकरी बांधवांचे डोळे आता आकाशातील पावसाकडे नाहीत. तर जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून साठवलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या हिरव्याकंच पिकांकडे लागले आहेत. या तलाव खोलीकरणामुळे मूळ सिंचनक्षमतेत 4.98 हेक्टरने वाढ झाली असून एकूण सिंचन क्षमता 54.98 हेक्टर झाली आहे. योजनेचे फलित बघून सर्वांचे स्वप्न सत्यात उतरले आहे.

पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून विविध कामांचे कल्पकतेने नियोजन करण्यात आले असून त्याबाबतची प्रभावी अंमलबजावणी सुरु झाली आहे. हीच या योजनेकडे होणारी प्रगतीची वाटचाल होय.

-जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *